नेप्ती उप बाजार समितीचे गेट बंद; शेतकऱ्यांनी अडीच तास रोखला रस्ता
नगर – नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत कांद्याचे बाजार अचानक मोठ्या प्रमाणात कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. नेप्ती उपबाजार समितीचे गेट बंद करुन शेतकऱ्यांनी सुमारे अडीच तास रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
नेप्ती कांदा बाजारात सोमवारी झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्यास 3500 ते 4000 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळालेला होता. दोन नंबर कांद्यास 2500 ते 3400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळालेला होता. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते. आज (मंगळवारी) सकाळी लिलाव सुरू झाल्यानंतर एक नंबरच्या कांद्यास 2500 रुपये पेक्षाही कमी बाजारभाव व्यापाऱ्यांनी दिल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यात संतापाची लाट निर्माण झाली. शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पडून आंदोलन सुरू केले. यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बायपास रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी शेतकऱ्यांसह पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी मार्केट कमिटीचे सभापती विलास शिंदे, माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, संचालक बाळासाहेब निमसे, बाबा पाटील खर्से आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात होता. रस्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. मार्केट समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून फेरलिलावाचे आश्वासन मिळाल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा