पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, विरोधक अविश्वास ठराव आणणार असले तरी तो टिकणार नाही. ही अपरिपक्व राजकीय खेळी आहे. हात दाखवून अवलक्षण अशी विरोधकांची भूमिका असू नये. विरोधकांची झाकली मूठ अशी उघडी करू नये. सरकार पडण्याची स्थिती दिसत नाही. भाजपाकडे पुरेसे संख्याबळ आहे आणि केंद्र सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल.
भाजपा विरोधात काही पक्ष एकत्र येत आहेत पण या घडामोडींमध्ये शिवसेना कुठेही नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने कधीही काम केलेले नाही. पण भक्कम विरोधी पक्ष असणे हे देशाच्या लोकशाहीसाठी सुचिन्ह आहे. काही विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजप विरोधात वातावरण तयार होऊ शकते हे आम्ही आधीपासून बोलत आलो आहोत आणि भाजपाने त्या बाबत आत्मचिंतन करणे आवश्यक आहे, असेही राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत २०१९ मधील लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा शिवसेनेने अनेकदा दिलेला आहे. मात्र, राऊत यांच्या वक्तव्यामुळे केंद्र व राज्यात तूर्त तरी शिवसेना भाजपासोबतच राहील,असे स्पष्ट दिसते