0

सांगोला/प्रतिनिधी 
सांगोला एस.टी. आगारातील डांबरीकरणासंदर्भात लवकरच कामे सुरू करुन आगारामध्ये सोयीसुविधा व स्वच्छता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील आगारातील एस.टी. बसेसच्या वापराची मर्यादा संपली आहे अशा एस.टी. बसगाडयांची तपासणी करुन त्या गाड्या बंद करुन नवीन एस.टी. बस सुरू करण्यासाठी तातडीने आदेश देणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजयकुमार देशमुख यांनी दिली.

     पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी काल सोमवार दि. २२ जानेवारी रोजी सांगोला दौरा केला. यामध्ये भाजपा शहराध्यक्ष आनंद फाटे यांच्या निवासस्थानी भेट दिली असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना ते बोलत होते. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, शहराध्यक्ष आनंद फाटे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अङ गजानन भाकरे, डॉ. परेश खंडागळे, अल्पसंख्याकचे तालुकाध्यक्ष तानाजीनाना कांबळे, माजी तालुकाध्यक्ष संजय गंभीरे, माणिक सकट, संजय बाबर, भारत गडहिरे यांच्यासह सांगोला शहर व तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले सध्या एस.टी थांबासाठी गावपातळीवर परिवहन महामंडळाच्या प्रत्येक गावाच्या मध्यभागी मिनी बसस्थानकाच्या जागा राखीव आहेत. या जागेवर महामंडळांकडुन विकास होण्यासंदर्भात मागणी येत आहे. या गावपातळीवरील बसस्थानकांच्या जागा सुधारीत करण्यासाठी लवकरच प्रयत्न केला जाणार आहे. सांगोला एस.टी. आगारासंदर्भात तालुका भाजपाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी लक्ष घालुन त्यामधील त्रुटीबाबत पत्रव्यवहार करावा. त्यानंतर तातडीने आगाराचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल. जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यातील वैद्यकिय अधिकारी यांच्यासह अनेक जागा रिक्त आहेत त्यासंदर्भात शासनाकडुन आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. लवकरच सांगोला तालुक्यासह जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरली जातील असा विश्वास देत फेडरेशन च्या माध्यमातुन मका खरेदी केंद्राव्दारे शेतकऱयानी केलेल्या ऑनलाईन अर्जानुसार काही शेतकऱ्यांची मका खरेदी झाली आहे तर अनेक शेतकरी मका विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत चौकशी करुन मका खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top