0

शहीद धर्माजी पाटील यांना जाहीर पञ... प्रेम कुमार  बोके

 अमरावती/प्रतिनिधी  जयेंद्र गाडगे,
स्मृतीशेष धर्माजी पाटील,
           तुमच्यासोबत काय बोलावं आणि कसं बोलावं काही समजत नाही.मन अस्वस्थ आणि बैचेन झालं आहे. आणखी किती धर्मा पाटलांचे खून या निगरगट्ट व्यवस्थेला करायचे आहे या विचाराने मनाला फार यातना होत आहे.तुमच्यासारख्या ८० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या वृध्दाला ज्या ठिकाणावरुन या  राज्याचा कारभार चालतो त्याच ठिकाणी विष प्राशन करुन आपली जीवनयाञा संपवावी लागते यापेक्षा देशाची भयान अवस्था दुसरी कोणती असू शकेल ? आता तर काही लिहावेसुध्दा वाटत नाही.कारण या बोथट आणि निकद्रू व्यवस्थेला आता सर्वसामान्य लोकांविषयी अजिबातही संवेदना किंवा आपुलकी राहिलेली नाही.तहसिलदार,कलेक्टर,कमिश्नर,पोलिस अधिकारी,राजकीय पुढारी यांना हजार वेळा विनंती, तक्रारी,मागण्या किंवा निवेदने देवूनही यंञणा जागेवरुन  हलायलाच तयार नाही.त्यामुळे सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सुध्दा हतबल होत आहेत.मग जर रागाच्या भरात कोणी तोडफोड,दमदाटी केली तर लवकरच कर्मचाऱ्यांच्या संघटना कामबंद आंदोलन करतात आणि आपल्या नालायक अधिका-याचे पाप लपवून त्याचे समर्थन करतात.धर्माजी,तुमच्या हत्येला कोण दोषी आहे यावर आता सत्ताधारी आणि विरोधकांमधे जोरदार राजकीय खडाजंगी सुरु झाली आहे.दोघांनाही तुमच्या मरणाशी काहीही घेणेदेणे नाही.तुमच्या मृत्यूचा राजकीय लाभ कसा मिळवता येईल याकरीता हे हपापलेले आहे.आणि सर्वात संवेदनाहीन आणि क्रूर कोण असेल तर सरकारी यंञणा आहे.थोडेफार सन्माननीय अपवाद सोडले तर बाकी अधिकारी इतके नालायक आणि भ्रष्ट आहेत की पैसे दिल्याशिवाय ते सर्वसामान्य माणसाकडे पाहायलाही तयार नसतात.जनतेचे नोकर असलेले हे अधिकारी,कर्मचारी  जनतेसोबतच बोलायला तयार नसतात.५ मिनिटांत होणा-या कामासाठी ५० वेळा गोरगरीबांना चकरा मारायला लावतात.त्यांना म्हाताऱ्या,थकलेल्या,वृध्द,अपंग गरीब लोकांची जराही दया येत नाही एवढे हे कठोर आणि दयाहीन आहे.तुमच्यासारखे किती धर्मा पाटील यांनी आतापर्यंत मारुन टाकले आहे.तरी यांच्या चेहऱ्यावर जराही दुःखाचे भाव नसतात.भ्रष्टाचाराच्या पैशावर अय्याशी करणारे हे समाजद्रोही निवृत्तीनंतर माञ कुञ्यापेक्षाही वाईट अवस्थेत जगतात कारण लोकांच्या नजरेत यांची कवडीचीही किंमत नसते.
      धर्माजी,तुमच्या वयाकडे पाहूनही कोणाला तुमची दया आली नाही,मदत करावी वाटली नाही.याचा अर्थ आम्ही किती भावनाहीन झालो आहोत ! लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेसाठी आहे की बड्या उद्योगपती आणि दलालांसाठी हे आता समजेनासे झाले आहे.ज्या शेतक-यांच्या जमिनी हिसकावून मोठमोठे प्रकल्प उभारले जातात,ज्या शेतक-यांच्या जमिनीवरच देशाचे सर्व लहानमोठे उद्योग उभे राहतात व उद्योगपतींच्या घशात शेतक-यांची हजारो एकर जमीन घालून त्यांच्या प्रेतावर यांच्या अनेक मजली आलिशान इमारती उभ्या राहतात त्याच शेतक-यांना या देशात इतकी वाईट वागणूक !
धर्माजी,आतापर्यंत तुमच्याप्रमाणेच अनेक शेतक-यांनी लालफितशाहीला कंटाळून मरणाला जवळ केले आहे.अनेकांच्या विधवा पत्नी आणि लहान लहान मुले अतिशय दयनीय अवस्थेत जीवन जगत आहे.परंतु कोणत्या अधिका-यांनी  त्यांच्या घरी जाऊन त्यांना काही मदत केली असे उदाहरण शोधून  सापडत नाही.काही अधिकारी निश्चितच चांगले आहे पण त्यांची संख्या किती आहे ? गावपातळीपासून तर मंञालयापर्यंत सर्वञ भ्रष्ट अधिका-यांची साखळी आहे.दिवसभर दोन नंबरचा पैसा कमवायचा आणि राञी हाॕटेलमधे मस्ती करायची अशी यांची नीती आहे.हेच खरे समाजाचे शञू आहे.यांनीच आपल्या देशाला अधोगतीच्या काठावर आणून ठेवले आहे.राजकारणी लोकांपेक्षा हे हजारपट चोर आहे.आपण नेहमीच लोकप्रतिनिधींना टार्गेट करतो.पण लोकप्रतिनिधी ५ वर्षानंतर बदलता येतात.ही नोकरशाही तर वर्षानुवर्षे आपल्या छाताडावर नाचत असते.कोणी लोकप्रतिनिधी,सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता यांनी जर त्यांना जाब विचारला तर त्यांच्यावरच हे खोट्यानाट्या केसेस दाखल करतात.इतकी ही नोकरशाही निर्ढावलेली आहे.
धर्माजी,सीमेवर शेतक-यांची मुले शहीद होतात आणि शेतात बाप शहीद होतो.दोघेही देशाला जगविण्यासाठीच कष्ट घेत असतात व वेळोवेळी शहीद होत असतात.परंतु शिकलेल्या व स्वतःला सुशिक्षित समजणा-या एका वर्गाला त्याचे काहीही सोयरसुतक नाही.साडी,माडी आणि गाडी यामधेच व्यस्त व रममाण असलेल्या या लोकांना सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखाशी काहीही घेणेदेणे नाही.शेजारचाही कोणी मेला तरी त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव दिसत नाही इतके हे लोक समाजापासून दुरावलेले आहेत.धर्माजी,तुम्ही स्वतः मरत असतांनाही दुस-यांचाच विचार करत होते.आपण नेञदान करुन मरणानंतरही लोकांच्या कामी पडले.आम्ही तर जीवंतपणीही कोणाला मदत करत नाही.
धर्माजी,या देशात धर्माच्या नावावर माणसे लवकर पेटून उठतात कारण त्यांच्या धार्मिक भावना दुखावतात.परंतु आपल्याच धर्मातील एक *धर्मा* आपल्याच धर्माच्या लोकांच्या ञासाला कंटाळून जीवनयाञा संपवितो,तेव्हा माञ आम्ही पेटून उठत नाही आणि आमच्या धर्मबांधवाच्या लज्जास्पद मृत्यूने आमच्या भावनाही दुखत नाही.माणसापेक्षा आम्हाला धर्म मोठा वाटतो.मग माणसे कितीही मेली तरी आम्हाला काहीच लाज वाटत नाही इतके आम्ही कठोर झाले आहोत.जाऊ द्या धर्माजी,आभाळच फाटले आहे तर ठीगळ तरी कुठेकुठे लावणार ? पण एक सांगतो शहीद धर्माजी,जोपर्यंत या देशातला माणूस जात-धर्म-पंथ- पक्ष यामधे गुरफटलेला राहील व आपल्या मुख्य प्रश्नांसाठी संघटीतपणे लढणार नाही तोपर्यंत आणखी शेकडो धर्मा पाटलांना  मंञालयात विष प्राशन करुन मरण्याकरीता प्रवृत्त केले जाईल हेही तेवढेच खरे !

टिप्पणी पोस्ट करा

 
Top