विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी महसूल व भूसंपादन, जिल्हाधिकारी आणि शेवटी मंत्रालय अशा पध्दतीने लढा दिला. प्रशासनातील भ्रष्ट यंत्रणेमुळे धर्मा पाटील यांनी मंत्रालयाच्या दालनात विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली. परंतू त्यांच्या मृत्यू नंतर जिल्ह्यात राजकीय नेत्यांमधील द्वेषाचे आणि सूडाचे राजकारण सुरू झाले आहे. जे निश्चित स्वरूपात जिल्ह्याच्या विकासास बाधक आहे.
धुळे जिल्हयातून नंदूरबार जिल्हा स्वतंत्र झाल्या नंतर केवळ चार तालुक्यांचा आणि पाच विधानसभा क्षेत्रांचा स्वतंत्र धुळे जिल्हा निर्माण झाला. धुळे शहरात भगवती प्रसाद पांडे, रा.भ.चौधरी, कमलबाई अजमेरा, किसनराव खोपडे, डॉ. शालीनीताई बोरसे, आ.अनिल गोटे, माजी आ. राजवर्धन कदमबांडे अशा विविध समाजाच्या नेत्यांनी शहराचे नेतृत्व केले आहे. त्यात कमलाबाई अजमेरा व डॉ. शालिनीताई बोरसे या दोन महिलांना मंत्रीमंडळात देखील संधी मिळाली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात माजीमंत्री रोहीदास पाटील, स्व.दत्तु अण्णा पाटील, स्व.व्यंकटराव अण्णा रणधीर, इंद्रसिंग भाऊसाहेब राजपूत, संभाजीनाना पाटील, आ. अमरीशभाई पटेल, दादासाहेब रावल, हेमंत नाना देशमुख, बापुसाहेब रावल, ठाणसिंग जिभाऊ, रामकृष्ण दोधा पाटील आणि त्यानंतर आमदार व आता मंत्री असलेले जयकुमार रावल, गो.शि.चौधरी, वसंत दोधा सुर्यवंशी,डी.एस.आहिरे अशा सर्व नेत्याने कमी अधिक काळ शिंदखेडा, शिरपूर, साक्री, धुळे ग्रामीण मतदार संघामध्ये सत्ता उपभोगली आहे. रामराव दादा पाटील यांना विधानसभेत यश मिळाले नसले तरी त्यांनी काँगे्रस पक्षांचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपली कादकिर्द गाजविली परंतू त्यांच्या धर्मपत्नी गोजरताई भामरे या मात्र साक्रीच्या आमदार झाल्या होत्या. त्यांचे सुपूत्र डॉ. सुभाषबाबा भामरे खासदार होवून देशाच्या मंत्री मंडळात मंत्री आहेत. आनंदीभाई कुमट, पी.डी.दलाल सारख्या नेत्यांनी विधान परिषदेवर नेतृत्व केलेलं आहे. धुळे नंदुरबार संयुक्त जिल्हा असतांना चुडामण अण्णा पाटील, पी.के.अण्णा पाटील, बटेसिंग भैया रघुवंशी, माणिकराव दादा गावित, स्वरूपसिंग नाईक यांनी जिल्ह्यासह देशपातळीवर राजकारण केले. गेल्या चाळीस वर्षांचा या चार दशकांचा कालखंड फार जुना नाही. या सर्व नेत्यांमध्ये खुप एकमत होते असाही भाग नाही. वैचारिक, राजकीय मतभेद होते. निवडणूकीच्या काळात आरोप प्रत्यारोप देखील व्हायचे. परंतू द्वेषाचे राजकारणातून एक दुसर्याला राजकीय जीवनातून संपविण्याचे सुडाचे राजकारण नव्हते. पी.के.अण्णांचे सर्वांशीच राजकीय मतभेद होते. स्वरूपसिंग दादा आणि रोहिदास दाजी यांचेही खुप काही जमले असे नाही. परंतू दोन्ही नेते मंत्रीमंडळात पहिल्या आणि चौथ्या क्रमांकावर मंत्रीमंडळाच्या यादीत राहीले. दादासाहेब रावल अल्पसंख्य राजपूत समाजाचे होते म्हणून त्यांना राजकारणात पुढे न येवू देण्यासाठी छुपे राजकारण सुरू असायचे. शिरपूर सारख्या मतदार संघात राजपूत, पाटील, माळी सामाजाचे प्राबल्य असतांना व्यंकट अण्णा सारखी धोबी समाजाची व्यक्ति आमदार झाली. अर्थात त्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा होता. आ.अमरीशभाई पटेल यांचे केवळ एकच घर असतांना सुध्दा ते गेल्या पंचवीस वर्षांपासून लोकप्रतिनीधी म्हणून निवडून येत आहेत. इंद्रसिंग भाऊसाहेब राजपूत समाजामुळे तर संभाजी नाना पाटील समाजाचे नेते म्हणून निवडून आलेत. रामराव दादा, दत्तु अण्णा आणि रोहिदास दाजी यांच्यात सुध्दा शिंदखेडा तालुका, धुळे तालुका, साक्री तालुका मतदार संघात उमेदवारी वरून बेबनाव झालेत. मदभेद झालेत. धुळे-नंदूरबार जिल्हा बँक, धुळे जिल्हा परिषद यातील सत्तेवरून, अध्यक्ष पदावरून सुध्दा अनेक वेळा जिल्हा नेत्यांमध्ये मतभेद झालेत. अर्थात त्यावेळी संयुक्त जिल्हा असल्याने राजकारणाचे केंद्र धुळे शहर होते. राजकीय जीवनात प्रत्येक व्यक्तिला विरोध असतो. एका पक्षाला विरोध करणारा दुसरा विरोधी पक्ष असतो. राजकारण हे कुणाचाही विरोध नसतांना सुरळीत असते असेही नाही. ‘एव्हरी थिंग इज फेअर लव्ह अॅण्ड वॉर’ असे म्हणतात. राजकारणात विरोधक असतातच. षडयंत्र, राजकीय खेळी, शह काटशह या गोष्टीसुध्दा असतात आणि त्या राजकारणात ग्राहय असतात. धुळे जिल्हयातील वर उल्लेख केलेला सर्व नेत्यांचे आपसात खुप चांगले संबंध होते असाही विषय नाही. परंतू खुप टोकाचे वैर होते असे सुध्दा नाही. मतभेद असणे आणि वैर असणे यात खुप मोठा फरक आहे. मतभेद हे तात्विक, वैचारिक, सैध्दांतिक असतात. परंतू वैर हे द्वेष, राग, घृणा, सुड घेणारे असते. एक काळ होता निवडणूका संपल्या, प्रचार संपला की निवडणूक प्रचारात केलेले आरोप-प्रत्यारोप देखील संपून जायचे. आपल्याच प्रतिस्पर्धी उमेदवाराचा सन्मान होत असे. परंतू अलिकडच्या राजकारणात मात्र देशपातळी पासून तर राज्यासह जिल्हा पातळीवर सुध्दा पक्ष संपविण्याची भाषा वापरली जाते. आणि त्याच दिशेने कृती सुध्दा सुरू होते. ही बाब सुद़ृढ लोकशाहीसाठी पुर्णपणे मारक आहे. विकासासाठी बाधक आहे. आणि सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातील संवाद आणि सहकार्य संपविणारे आहे. राजकारणात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे एका रथाची दोन चाके असतात. आणि दोन्ही पक्षामुळेच लोकशाहीची मूल्ये जीवंत आहेत. देशात, राज्यात, जिल्ह्यातच नव्हे तर आपल्या व्यक्तिगत राजकीय जीवनात देखील आपल्यावर विरोधी नेत्याचा आणि जनतेचा वॉच (लक्ष) असते. त्यामुळे आपण समाजहिताची कामे करतांना पक्षपात, भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार करीत नसतो. निवडणूका संपल्या की लोकप्रतिनीधी हा पुर्ण जनतेचा असतो. तो कुण्या एका पक्षाचा राहत नाही. परंतू या सर्व परंपरा धुळे जिल्हयात पायी तुडविल्या जात आहेत. जयकुमार रावल हे या जिल्ह्याचे युवा नेतृत्व आहे. राजघराण्यातील आहे. भ्रष्टाचाराचा एक डाग नसलेले नेतृत्व आहे. तालुक्याच्या आणि जिल्हयाच्या विकासात मोठे योगदान देणार आहे. धर्मा पाटील प्रकरणात प्रशासकीय अधिकार्यांनी आणि दलालांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेला आहे. परंतू त्या प्रकरणाला राजकीय रंग देवून जयकुमार सारख्या युवा नेतृत्वाला कसे घेरता येईल यासाठी अतिशय खालच्या पातळीचे राजकारण खेळले जात आहे. ज्यांना स्वत:ची घरे सांभाळता येत नाही त्यांनीही जयकुमार यांना कटघरात उभे करण्याची भाषा वापरावी आणि स्वत:चे हसे करून घ्यावे अशा प्रकारचे बालिश राजकारण सुरू आहे. जिल्ह्यात पांच ते सहा बँका बंद पडल्या. परंतू दादासाहेब रावल बँकेने राजकारण वारंवार उकरून काढले जात आहे. विकासकामांची श्रेयवादाची लढाई सुरू आहे. राजकीय जीवनात तडजोडी कराव्या लागतात. परंतू त्या कुणाचेही नुकसान करणार्या असू नयेत इतकी साधन सुचिता पाळली गेली पाहिजे. परंतू जो विषय संबंधित नाही त्याचा पराचा कावळा करायचा आणि एखाद्या व्यक्तिची प्रतिमा मलिन करायची असा हा घाणेरडा आणि शुद्र प्रकार आहे. सिध्दांतवादी राजकारणाचा जिल्ह्याला वारसा असतांना त्यात शिरलेला शूद्रपणा हा जिल्ह्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये घातक सिध्द होणार आहे हे मात्र नक्की...

टिप्पणी पोस्ट करा